इजिप्त हा उत्तर आफ्रिकातील देश आहे. इजिप्तचे क्षेत्रफळ अंदाजे १०,२०,००० चौरस किलोमीटर आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने इजिप्त हा जगात पंधराव्या क्रमांकाचा देश आहे. इजिप्तच्या ७.७ कोटी लोकसंख्येपैकी (२००५चा अंदाज) बहुतेक लोक नाईल नदीच्या जवळ राहतात. या भागातच शेतीयोग्य जमीन आहे. इजिप्तचा इतर बराच प्रदेश हा सहारा वाळवंटाचा भाग आहे. या भागात फार कमी लोक राहतात. आजकालच्या इजिप्तमधील बहुसंख्य लोक शहरी असून ते अरब लोकसंख्याबहुल अश्या कैरो व अलेक्झांड्रिया, या शहरांजवळ राहतात. इजिप्त हा देश त्याच्या प्राचीन संस्कृतीकरिता प्रसिद्ध आहे. गीझायेथील पिरॅमिड, कर्णाकचे मंदिर, राजांची दरी यासारखी जगातील प्रसिद्ध आश्चर्ये इजिप्तमध्ये आहेत. आजचा इजिप्त हा अरब व मध्यपूर्व भागाचे महत्त्वाचे राजकीय व सांस्कृतिक केंद्र समजला जातो.